पंढरपूरकरांसाठी खुशखबर... टाटा मेमोरियल ट्रस्ट पंढरीत उभारणार मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल!

Pandharpur Live Online: राज्य शासनाच्या सहभागातून आणि टाटा मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून राज्यात 2 ठिकाणी भव्य हॉस्पिटल व भव्य रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी या पंढरपूर आणि जालना या दोन शहरात भव्य हॉस्पिटल व भव्य रिसर्च सेंटर उभारण्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

पंढरपूरकरांसाठी खुशखबर...  टाटा मेमोरियल ट्रस्ट पंढरीत उभारणार मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल!
प्रतिकात्मक संग्रहित छायाचित्र

या बैठकीला टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. बडवे, डॉ. बानावली, सल्लागार आर. पी. तेरकर, आरोग्य आयुक्‍त डॉ. रामस्वामी आदी उपस्थित होते. टाटा मेमोरियल ट्रस्टच्यावतीने महाराष्ट्रात दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच कॅन्सर निदान संशोधन व उपचार केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू होते.

याबाबत कोणत्या शहराची निवड करावी, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

यावेळी पंढरपूरच्या संबंधित काही घटक या प्रक्रियेमध्ये असल्याने त्यांनी पंढरपूरच्या नावाबाबत आग्रह धरला. पंढरपूरची भौगोलिक स्थिती व राष्ट्रीय महामार्गाचे अद्ययावत जाळे, वाढते शहरीकरण, तीर्थक्षेत्र या गोष्टींचा अभ्यास करून पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण होऊ शकेल, असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागासाठी जालना हे मध्यवर्ती ठिकाण ठरेल. कोकण, उर्वरित महाराष्ट्र यासाठी पंढरपूर हे मध्यवर्ती केंद्र ठरु शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला.

या केंद्रातून गोरगरीबांना उपचार परवडण्यासाठी शासनाच्या सहकार्यातून मोठी मुलभूत व्यवस्था असणारे हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता आहे. यावर एकवाक्यता झाल्याने याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. जर हे केंद्र पंढरपूरमध्ये झाले तर हा भाग मेडिकल हब म्हणून विकसित होईल. राज्यभरातील गरीब रुग्णांसाठी येथे स्वस्तात उपचार उपलब्ध होतील. त्याअनुषंगाने हॉटेल, रेस्टॉरंट सारखी सेवा देणारी क्षेत्रे विकसित होतील, अशीही यावेळी चर्चा झाली.

पंढरपूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच कॅन्सर निदान संशोधन व उपचार केंद्र उभारण्यात आले. तर त्याकरीता अत्याधुनिक उपचार व्यवस्था, निवास व्यवस्था, देश विदेशातील तंत्रज्ञान, डॉक्टर्स उपलब्ध करुन महाराष्ट्रात एक सर्वाधिक विकसीत सेंटर होण्यास मदत होणार आहे.लवकरच पंढरपूर व जालना शहराची अधिकृत घोषणा होईल, असे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले.

या प्रकल्पामध्ये टाटा मेमोरियल ट्रस्ट हे तांत्रिक सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्‍चर, प्रशिक्षण याबाबत करारही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर्स व नर्सिंगकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.