मराठी माणसाची `किक स्टार्ट जीप ´ पाहून आनंद महिंद्रानी दिली `ही´ खास ऑफर

मराठी  माणसाची  `किक  स्टार्ट  जीप ´ पाहून आनंद  महिंद्रानी  दिली  `ही´   खास  ऑफर

Pandharpur Live Online :

उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे चर्चेत असतात. आनंद महिंद्रा यांनी एक व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत एक माणूस किक मारून जीप स्टार्ट करतोय. ही जीप त्याने भंगारचं सामान एकत्र करून बनवली आहे.

हा व्हीडिओ पाहून आनंद महिंद्रांनी या माणसाला खास ऑफरही दिली आहे.भंगारच्या सामानातून एक मॉडीफाईड जीप महाराष्ट्रातल्या एका मराठी माणसाने तयार केली आहे. त्याचं नाव दत्तात्रय लोहार असं आहे. शिक्षण कमी असूनही लोहार यांनी एक खास जीप तयार केली जी किक मारून स्टार्ट करता येते. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 60 हजार रूपये खर्च करून त्यांनी ही जीप तयार केली आहे. किक स्टार्ट सिस्टिम ही दुचाकीमध्ये असते. मात्र दत्तात्रय लोहार यांनी चारचाकी जीपला किक स्टार्ट केलं आहे. आनंद महिंद्रांनी त्यांचा व्हीडिओ ट्विट केला आहे.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर तो खूप व्हायरल झाला आहे. हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की 'हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि 'किमान' क्षमतेचे कौतुक करणे मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे.'

एवढंच नाही तर आनंद महिंद्रा असं म्हणाले आहेत की या माणसाला ही जीप चालवल्यापासून जर कुणी रोखलं तर मी व्यक्तीगत रित्या त्यांना या गाडीच्या ऐवजी एक बोलेरो गाडी देईन. ही जीप त्यांनी तयार केली आहे मात्र ती नियमांना धरून नाही. त्यामुळे त्यांना रोखलं जाऊ शकतं. असं झालं तर या जीपच्या बदल्यात मी त्यांना एक बोलेरो देईन. या माणसाने जीपचं जे डिझाईन केलं आहे ते आम्ही महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित करू शकतो. कमीत कमी खर्चात तयार केलेली ही जीप आणि त्याचं डिझाईन कौतुकास्पद आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विट केलेला हा व्हीडिओ 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसंच हा व्हीडिओ १५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. अनेक लोक या व्हीडिओवर कमेंटही करत आहेत.