शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन तोडणीला अखेर स्थगिती

शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन तोडणीला अखेर स्थगिती

पंढरपूर लाईव्ह ऑनलाइन

सोलापूर : अतिवृष्टीत वाचलेली पिके सध्या पाण्याअभावी कोमेजून चालली आहेत. विहिरी व बोअरला पाणी आहे मात्र, पाणी देण्यासाठी वीज नाही, अशी विचित्र स्थिती सध्या सोलापूरच्या ग्रामीण भागात झाली आहे.थकित विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणने सुरु केलेल्या कृषी पंपाच्या वीजतोडणी मोहिमेमुळे बळीराजा संकटात सापडला होता.

♦️ *जगातील सर्वात जास्त विक्री व सर्वात कमी डिझेल लागणारे ट्रॅक्टर! एक्सकॉर्टस पॉवरट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे अधिकृत शोरूम ’शिंदे ट्रॅक्टर्स'*

 *चंद्रभागेच्या पैलतीरावर, अहिल्या पुलानजीक, पंढरपूर उत्कर्ष गॅलरीचे पुढचे पाऊल! संपर्क: - 9673999695

सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाची हीच कैफियत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे या दोन मामांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. ऊर्जामंत्री राऊत यांनी या दोन्ही मामांची तत्काळ दखल घेत कृषी पंप कनेक्‍शन तोडण्याची मोहीम थांबविण्याची सूचना आज (ता.27 ऑक्टोबर) सोलापूर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होणारी विज तोडणी आता थांबल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सोमवारी (ता.25 ऑक्टोबर) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी कृषी पंप कनेक्‍शन तोडण्याचा मोहिमेचा मुद्दा उपस्थित केला होता. शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. मात्र, त्यांना मुदत हवी आहे. त्यांनी किती पैसे भरले आहेत आणि किती पैसे शिल्लक आहेत? याची माहिती त्यांना मिळायला हवी. विजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत मुदत द्या अशी आग्रही मागणी आमदार शिंदे यांनी या बैठकीत केली होती. या मागणीवर भाजप आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत व आमदार राम सातपुते यांनीही आवाज उठविला होता.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आपण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटू. तुम्ही सर्व आमदार मुंबईला या, असे आश्वासन सोमवारच्या बैठकीत दिले होते. मात्र, आज ऊर्जामंत्री राऊत यांच्याकडे जाण्यासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे वगळता जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित राहिले नाही. पालकमंत्री भरणे, आमदार शिंदे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे हे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे गेले व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कैफियत त्यांनी मांडली.

यावर आज संध्याकाळपर्यंत आदेश देतो, असे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले होते. त्यानुसार आज ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सोलापूरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना कृषी पंपाची वीजतोडणी मोहीम स्थगित करण्याची सूचना करण्यात आली आहे. यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील कृषी पंपाची वीज कनेक्‍शन दिवाळीपर्यंत तोडले जाणार नसून शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाचे हप्तेही पाडून दिले जाणार आहेत असल्याचे सांगितले. याबरोबरच कृषी पंप धोरणामध्ये जे शेतकरी सहभागी होतील त्यांचे 65 टक्के वीजबिल माफ करत शेतकऱ्यांनी भरलेल्या थकीत वीज बिलापैकी 66 टक्के रक्कम दोन टप्प्यात त्याच ग्रामपंचायतीतील वीज वितरण दुरुस्तीच्या कामासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले आहे.