मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून होणार सोलापूरकरांचे लसीकरण

मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून  होणार सोलापूरकरांचे लसीकरण

Pandharpur Live Video News Updates Today

................

......................

......................

........................

Pandharpur Live Online: शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी 14 ऑक्टोबरपासून 'मिशन कवच कुंडल'अंतर्गत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

मिशन कवच कुंडल'अंतर्गत 'सिटी टास्क'फोर्सची बैठक आयुक्त कार्यालयात झाली. या बैठकीत लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. ज्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण कमी झालेले आहे त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात झाली. 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी अद्यापि लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यांना मोबाईल व्हॅनच्या मदतीने लस देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

सोलापूर महापालिकेच्या मजरेवाडी नागरी आरोग्य केंद्रात सर्वाधिक 91 टक्के लसीकरण झाले आहे. देगाव नागरी आरोग्य केंद्रात 84 टक्के, भावनाऋषी नागरी आरोग्य केंद्रात 80 टक्के लसीकरण झाले आहे. नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्रात फक्त 25 टक्के, दाराशा नागरी आरोग्य केंद्रात 30 टक्के, सिव्हील हॉस्पिटल परिसरामध्ये 35 टक्के, जिजामाता नागरी आरोग्य केंद्रात 40 टक्के लसीकरण झाले आहे.

मिशन कवच कुंडल'मध्ये नागरी आरोग्य केंद्रांअंतर्गत आणखी लसीकरण केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी रोटरी क्लब आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या मदतीने 14 ऑक्टोबरपासून मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक ठिकाणी जाऊन मोफत लस देण्यात येईल. ज्या प्रभागात कमी लसीकरण झाले आहे त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच नागरिकांनी नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घ्यावी, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

सोलापूर शहरातील ज्या भागात लसीकरण कमी झाले आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक दुकान, इतर व्यावसायिक ठिकाणांना भेट देऊन त्याठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे की नाही, याची तपासणी करतील. लसीकरण झाले नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.