पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठात ‘साने गुरुजी स्मृती केंद्र पंढरपूर’  व ‘संत विचारपीठ पंढरपूर’यांच्यातर्फे ‘विचार मंथन सभा’ संपन्न 

पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठात ‘साने गुरुजी स्मृती केंद्र पंढरपूर’  व ‘संत विचारपीठ पंढरपूर’यांच्यातर्फे ‘विचार मंथन सभा’ संपन्न 

PANDHARPUR LIVE ONLINE 

पंढरपुरात 'साने गुरुजी स्मृती केंद्र’आणि ‘संत विचार पीठ' होणार .....!
                                                                                      -राष्ट्र सेवादलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक

पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठात ‘साने गुरुजी स्मृती केंद्र पंढरपूर’ 
व ‘संत विचारपीठ पंढरपूर’यांच्यातर्फे ‘विचार मंथन सभा’ संपन्न 

पंढरपूर- ‘संत शिरोमणी नामदेव महाराज, जगदगुरू तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्था व्हावी असे १३-१४ व्या शतकात प्रयत्नपूर्वक सांगितले पण तरीही २० व्या शतकात पंढरपुरात येवून साने गुरुजींना अस्पृश्यांना श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आमरण उपोषण करावे लागले. हा इतिहास आहे. म्हणून असे समतेचे जागर वारंवार झाले पाहिजेत आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूरमध्ये 'साने गुरुजी स्मृती केंद्र' आणि 'संत विचार पीठ' लवकरात लवकर स्थापन केले जाईल.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्र सेवादलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी केले. 


           पंढरपुरातील संत कैकाडी महाराज मठामध्ये साने गुरुजी स्मृती केंद्र, पंढरपूर व संत विचारपीठ, पंढरपूर तर्फे ‘विचार मंथन सभा’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा उपस्थित होते. तसेच राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी उपस्थित बुद्धीवादी विचारवंतांना मार्गदर्शन करत पंढरपूर येथे लवकरात लवकर 'साने गुरुजी स्मृती केंद्र' आणि 'संत विचार पीठ' स्थापन होत असल्याचे आपल्या मनोगता मध्ये जाहीर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. भारत जाधव महाराज (कैकाडी महाराजांचे वंशज) हे होते. संतश्रेष्ठ नामदेव, साने गुरुजी व संत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानंतर साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ...’ या प्रार्थनेने विचार मंथन बैठकीला सुरुवात झाली. त्यापूर्वी सर्व विचारवंतांनी नामदेव पायरी जवळ संत श्रेष्ठ नामदेव महाराज पादुका व चोखा मेळा यांचे समाधी वर पुष्पहार अर्पण करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तिथेच संत श्रेष्ठ नामदेव महाराज व जगदगुरू तुकाराम महाराज यांचे अभंग गायले गेले. तदनंतर सर्वजण चालत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या जवळ आले आणि त्यांना पुष्पहार अर्पण करून सर्वजण संत कैकाडी महाराज मठामध्ये एकत्रित आले. बैठकीच्या प्रास्ताविकामध्ये दादासाहेब रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून ‘समतेचा जागर करण्यासाठी आपण सर्वांनी वारंवार एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून तेराव्या व चौदाव्या शतकातील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. पुढे त्यांनी साने गुरुजींनी पंढरपूरला उपोषण का केले? हे स्पष्ट करून पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठामध्ये साने गुरुजींच्या पुतळ्याचे लवकरच उदघाटन होणार असल्याचे सांगितले. समताधिष्ठीत समाज तयार करणे हे ध्येय समोर ठेवून ज्या प्रमाणे परमपूज्य साने गुरुजी यांनी आपल्यावर संस्कार केले आहेत त्याचा जागर वेळोवेळी व्हावा यासाठी पंढरपुरात ' साने गुरुजी स्मृती केंद्र' आदरणीय राजाभाऊ अवसक यांचे मार्गदर्शनाखाली तयार होत आहे. त्यामध्ये ज्या संत तनपुरे महाराज मठामध्ये साने गुरुजींनी आमरण उपोषण केले त्या ठिकाणी गुरुजींचा पुतळा बसविला जाणार असून त्यांचा जीवनपट चित्र रूपाने भिंतीवर लावणार आहोत. प्रत्येक वर्षी १० मे ला संपूर्ण महाराष्ट्रातून साने गुरुजी प्रेमींनी इथे पंढरपुरात यावे व समतेचा जागर करावा असे अपेक्षित आहे व त्यानुसार काम केले जाईल. ‘संत विचार पीठ पंढरपूर’ या मंचाची स्थापना करून त्याद्वारे पंढरपुरात एक अद्ययावत ग्रंथालय, चिंतन करण्यासाठी अभ्यासिका, प्रबोधनासाठी सभागृह आणि  प्रवचनकार/ कीर्तनकार शिक्षित करणेसाठी संस्था उभी करणे असे नियोजन असणार आहे. यानंतर ह.भ.प. धनंजय होनमाने, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, ह.भ.प. डॉ.श्रीरंग गायकवाड, ह.भ.प. डॉ.श्यामसुंदर मिरजकर, आदी विचारवंतांनी आपले अनमोल विचार प्रकट केले. जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले की, ‘संविधानामध्ये अभिप्रेत असणारे व  समताधिष्ठित समाज व्यवस्था असलेले राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी आपापल्या माध्यमातून सातत्याने कार्य करणे गरजेचे आहे. साने गुरुजींच्या उपोषणाला यश मिळाले कारण त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेवून संघटीत रित्या कार्य केले. गांधीजींनी १९३२ साली केलेल्या उपोषणाचा मुद्दाही हाच होता. एकत्र राहून संघर्ष केल्यास त्याचा परिणाम तत्काळ मिळतो त्यामूळे सर्वांनी प्रथम संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. समाज परिवर्तनासाठी संघटना बांधणी खूप गरजेची आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची स्थिती आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातील स्थिती यांचा अभ्यास केला तर संघटना बांधणीचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येते. पंच्याहत्तर वर्षापूर्वी पंढरपुरात साने गुरुजींनी हरिजनांच्या मंदिर प्रवेशासाठी दहा दिवस उपोषण केले होते. त्यातून क्रांती झाली आणि                                      

                                                                                                                
सर्वांच्या सहकार्याने ते यशस्वीही झाले व मंदिर प्रवेशाचा प्रश्न सुटला. कष्टकऱ्यांची जीवनशैली पाहिली आणि संतांच्या विचारांवर प्रकाश टाकला तर रोजचे जीवन चांगले जगण्यासाठी चांगल्या आचार-विचारांची आवश्यकता असल्याचे आपल्याला सहज समजून येईल. कष्टकरी, गरीबांची अडवणूक, विषमता व पिळवणूक ही पुर्वी त्रासदायक होती. माणसे पेटून उठल्याशिवाय चळवळ यशस्वी होत नाही. भटक्या-विमुक्तांची स्थिती, गावात असणाऱ्या विधवा, परितक्त्या यांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू करणे, जुन्या व बुरसटलेल्या परंपरांना दूर ठेवणे आवश्यक आहे. तसेच समाजात असे संस्कार रुजावेत यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषांनी बरोबरीने काम करावे यासाठी शिक्षकांनी, कीर्तनकारांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. आपापल्या क्षेत्रात जबाबदारी पार पाडणाऱ्यांनी समताभाव कसा निर्माण होईल व स्थायीभाव भाव कसा टिकेल यासाठी प्रयत्न करावे. एकूणच आपले काम व कष्ट पुढे जाण्यासाठी व चांगले विचार पसरवण्यासाठी आज समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे.’ असे आवाहनही सुराणा यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना ह.भ.प. भारत महाराज जाधव म्हणाले की, ‘संतांच्या तत्वांना मानणारे लोक आजही आहेत. प्रत्येक कार्यात जर सर्वांनी झोकून देऊन योगदान दिल्यास यशस्वी होता येते. बंदूक देणे सोपे आहे पण त्याच हातात पुस्तक देणे मात्र प्रचंड अवघड आहे आणि हेच अवघड कार्य आपल्याला करायचे आहे. सध्या पंढरपुरामध्ये संस्काराच्या माध्यमातून वारकरी शिक्षणाची परंपरा सुरू व्हायला पाहिजे. त्यामुळे नव्या पिढीवर योग्य संस्कार होतील. जोपर्यंत वाईट कळत नाही, तोपर्यंत चांगले समजू शकत नाही. यासाठी आज संतांचे विचार रुजविणे महत्वाचे आहे आणि हे कार्य संत विचार पिठाच्या माध्यमातून व्हावे या दृष्टीने संत विचार पुढे नेण्यासाठी हे व्यासपीठ आपल्यासाठी सदैव खुले राहील.’ असे आश्वासनही शेवटी ह.भ.प. भारत जाधव यांनी दिले. यावेळी समाजसेवक चंद्रकांत देशमुख, जेष्ठ पत्रकार व संपादक शिवाजी शिंदे, दत्ता कोंडलकर, ह.भ.प.मोहनानंद महाराज, ह.भ.प.संतोष महाराज, ह.भ.प.बाळासाहेब कुंभार, ज्येष्ठ समाजसेवक उपेंद्र टन्नु, माधवराव कारंडे, नागेश अवताडे, प्रा. गुरुराज महाराज इनामदार, संदीप वाकचौरे आदी संत साहित्यातील विचारवंत उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले तर सुभाष करे यांनी आभार मानले.