शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे : दिल्लीला जाताना नवनीत राणांचे अजितदादांना साकडे !!

शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे.
नवनीत राणा यांनी दिल्लीला जाताना आपण कोणत्याही कोर्टाच्या अटी शर्तींचा भंग केला नसल्याचा दावा केला आहे. आम्ही मातोश्री - हनुमान चालीसा या विषयी काही बोललो नाही. आम्हाला तुरुंगात झालेल्या त्रासाविषयी आम्ही स्पष्ट बोललो जो त्रास झाला तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आम्हाला तुरुंगात त्रास दिला. तुरुंगात जरी आम्ही लोकप्रतिनिधी नसलो तरी सामान्य कैद्यांना वागणूक देण्याचे देखील काही नियम आहेत, ते त्यावेळी पाळले नाहीत. मला वैयक्तिक वैद्यकीय समस्या असताना उपचार दिले नाहीत, याविषयी आम्ही पत्रकारांशी याबाबत बोललो, असे नवनीत राणा म्हणाल्या.
पण त्या पलिकडे जात नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले. अजित पवार परखड बोलतात. ते आम्हाला न्याय देतील. मुख्यमंत्री स्वतः काम करत नाही पण अजित पवार भरपूर काम करतात. त्यांनी तुरुंगात मला झालेल्या त्रासाविषयी व्यवस्थित माहिती घ्यावी आणि त्यानंतर भाष्य करावे. ते मला न्याय देतील असा मला विश्वास वाटतो, असे सांगून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राजकीय मेख मारून ठेवली आहे.
दिल्लीत त्या फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात करणार आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांची तक्रार प्रामुख्याने शिवसेने विरोधात आहे. राष्ट्रवादी विरोधात त्यांना कोणतेही पाउल उचलायचे नाही. कारण शिवसेनेचे वरिष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या बळावर नवनीत राणा यांनी अमरावतीतून लोकसभेत प्रवेश केला आहे.
हे त्या विसरलेल्या नाहीत.
- शरद पवारांशी जवळीक
आधीच शरद पवारांशी साधलेली जवळीक आणि आता अजित पवारांना घातलेले साकडे यातून शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळ्याचा दुसरा अंक सुरू झाल्याचेच अधोरेखित होत आहे.