संतापजनक , सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत , आंतरजातीय विवाहाला विरोध असलेल्या आई - वडिलांचे भयंकर कृत्य

संतापजनक , सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत , आंतरजातीय विवाहाला विरोध असलेल्या आई - वडिलांचे भयंकर कृत्य

अमरावती - आंतरताजीय प्रेमविवाह (love marriage)केला म्हणून संतापलेल्या आई वडिलांनी, सासरच्या घरात जाऊन आपल्या मुलीला फरफटत घराबाहेर काढले आणि रस्त्यावरुन ओढत घरी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . अमरावती ( Amravati ) जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अंबाडा गावात हा प्रकार घडलाय . मुलीच्या सासरी जाऊन केलेल्या या कृत्याचा व्हिडीओही ( video ) समोर आला आहे . भर दिवसा सासरी मुलगी असताना , तिचे आई - वडील घरात आले आणि त्यांनी आरडाओरड करत तिला फरफटत घराबाहेर आणले . आंतरजातीय विवाहाला आजही ग्रामीण भागात किती टोकापर्यंत विरोध होऊ शकतो , याचे हे कृत्य एक मोठे उदाहरण आहे .

काय आहे व्हिडिओत

एकमेकांवर प्रेम असलेल्या तरुण - तरुणीने 28 एप्रिलला आर्य समाज मंडळात विवाह केला होता . या लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता . मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर 4 मे रोजी तिच्या माहेरची मंडळी सासरी दाखल झाली . यातल्या काही जणांनी आपले तोंड झाकून घेतल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे . घरात आल्यानंतर तिच्या आई - वडिलांनी अक्षरश : तिला फरफटत घराबाहेर काढत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसते आहे . ही तरुणी जाण्यासाठी तयार नव्हती , मात्र जबरदस्तीने तिला ओढत घराबाहेर काढले , यात ती तरुणी घरासमोरच्या पायऱ्यांवरुन पडली , मात्र तरीही माहेरच्या माणसांना तिची दया आलेली दिसत नाही . या घटनेनंतर तिथे एकच आरडाओरड सुरु झाली . सासरच्या घरातली मंडळीही घडलेल्या या प्रकाराने गांगरुन गेली . मात्र तेवढ्या वेळात या तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी या तरुणीला घेऊन तिथून पळ काढला . लग्न घरात असलेल्या मुली , महिलांचा आरडाओरडा , भीतीही या व्हिडीओतून स्पष्ट जाणवते आहे . सासरच्यांनी तिला सोडवण्यासाठी मागे धाव घेतली खर , मात्र त्यात ते यशस्वी होऊ ठकले नाहीत .

तरुणाचे कुटुंबीय चिंतेत

आपल्या घरात नुकत्याच आलेल्या तरुणीला असे उचलून नेल्याने , थोड्याच वेळात लग्न घरावर शोककळा पसरली . यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली . मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचा मुलांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे .

चौकशी करुन कारवाई करणार - पोलीस

या तरुणीला फरफटत नेण्याचा प्रकार सुरु असताना , घराच्या शेजारी असणाऱ्या एका मुलीने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे व्हिडिओ पाहिल्यावर दिसते आहे . ४ मेच्या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्याने पोलिसांना आता या प्रकरणी कारवाई करावी लागणार आहे . आता या मुलीची चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .