पंढरपूर : पोलिसांनी जप्त केला १७ लाखांचा मुद्देमाल

पंढरपूर : पोलिसांनी जप्त केला १७ लाखांचा मुद्देमाल

पंढरपूर: तालुक्यातील देगाव येथे अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर आणि ४५ ब्रास वाळूसह १७ लाख २५ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी आठ आरोपींविरुध्द पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध वाळू उपसा व विक्री करणाऱ्या लोकांविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घोळवे, पोलिस उपनिरीक्षक बिराजी पारेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब मुंढे, पोलिस हवालदार अक्षय दळवी यांच्या पथकास कारवाईसाठी पाठवले होते.

त्यानुसार त्यांनी देगाव येथे जाऊन छापा टाकला. त्यावेळी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करत असलेले तीन ट्रॅक्टर व ४५ ब्रास वाळू असा एकूण १७ लाख २ हजाराचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी खंडू नागनाथ पाटूले, महेश हरी चव्हाण यांना अटक केली आहे. त्यांच्यासह रोहित कैलास वायदंडे, गमल्या मारुती पवार, अप्पा किसन चव्हाण, सिध्दा चव्हाण, सोमा जाधव, अक्षय घाडगे, अशा आठ जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.