पंढरपूर विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात दर्शन , पुजेसाठी आता नवे नियम

पंढरपूर विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात दर्शन , पुजेसाठी आता नवे नियम

PANDHARPUR LIVE ONLINE

देशासह राज्यातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाहणीसाठी पाठवलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाने आपला अहवाल राज्य सरकार आणि मंदिर समितीकडे सुपूर्द केला आहे.

मूर्तीची झीज थांबविण्यासाठी पथकाने अहवालात विविध सूचना केल्या आहेत. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनेही बैठक घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुरातत्व विभागाच्या अहवालावरून मंदिरातील मूर्तीला हानिकारक ठरणाऱ्या ग्रॅनाईटच्या फरशा तातडीने काढण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. देवाला अभिषेक करताना दूध, दही, मध आणि साखर या पदार्थांचा मर्यादित वापर करून क्षारमुक्त आरओ पाण्याचा वापर करण्याचा तसेच अभिषेक करताना मूर्तीच्या डोक्यावरून हळू पाणी घालण्याचा निर्णयही घेतला आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या अवतीभवती सजावट केली जाते. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फळे, फुलांमुळे मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे मंदिरातील चौखांबीच्या बाहेर सजावट करण्यावर विचार सुरू आहे. रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाली आहे. ती रोखण्यासाठी वज्रलेप लावण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. रुक्मिणीच्या मूर्तीच्या पायाची झालेली झीज समितीच्या निदर्शनास का आणून दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिराचा गाभारा लहान असून भाविकांच्या गर्दीमुळे तिथे मोठ्या प्रमाणात आर्द्रता तयार होते. या वातावरणाचा परिणाम मूर्तीवर होतो. त्यावर उपाय म्हणून तापमान संवेदक (टेम्परेचल सेंसर) लावण्यात येणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या ३२ ते ३५ अंशांपर्यंत तापमान जात असल्याने मूर्तीवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे २२ ते २५ अंशापर्यंत तापमान कायम राखणे आवश्यक आहे. त्यामुळे मर्यादित भाविकांना गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे. तसेच गाभाऱ्यातील उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.