अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटक पुन्हा टळली

धुळे : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी मागील वर्षी अटक केली होती.
धुळ्यामध्ये राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी राणेंवर कारवाई होण्याची शक्यता होती. त्याआधीच राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी राणेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला होती. उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे कारवाईपासून संरक्षण दिलं होतं. आता सत्र न्यायालयानंही राणेंना दिलासा दिला आहे.
यानंतर राणेंच्या वतीनं वकील अनिकेत निकम यांनी धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाला पोलिसांना विरोध केला. मात्र, न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावर बाजू मांडताना वकील निकम म्हणाले की, राणेंनी कोणताही कायदा हातात घेतलेला नाही. त्यांनी कोणत्याही गटाला अथवा वर्गाला चिथावणी दिलेली नाही. राज्य सरकारने राणेंच्या विरोधात एकाच प्रकारच्या एफआयआर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केल्या आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणची कलमे वेगळी असून, यात राजकीय हेतू दिसत आहे. राणे हे केंद्रीय मंत्री असून, ते फरार होण्याची भीती नाही. पोलिसांनी त्यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा.
राणे यांना मागील वर्षी 24 ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राणे यांच्यावर पुणे व नाशिकमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात त्यावेळी न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर राणे यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला होता. राज्य सरकारवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.