स्वेरीच्या डॉ. पवार यांचा भारतातील पहिली ‘कार्बन-न्यूट्रल पंचायत’  असलेल्या राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या प्रदर्शनामध्ये सहभाग

स्वेरीच्या डॉ. पवार यांचा भारतातील पहिली ‘कार्बन-न्यूट्रल पंचायत’  असलेल्या राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या प्रदर्शनामध्ये सहभाग

 
स्वेरीच्या डॉ. पवार यांचा भारतातील पहिली ‘कार्बन-न्यूट्रल पंचायत’ 
असलेल्या राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या प्रदर्शनामध्ये सहभाग

प्रदर्शनात स्वेरीच्या आकृतीचीच अधिक चर्चा

पंढरपूर- ‘पंचायती राज दिवस २०२२' च्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि पंचायती राज यांचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने पहिली ‘कार्बन-न्यूट्रल पंचायत’ असलेल्या 'राष्ट्रीय पंचायती राज दिना' च्या प्रदर्शनाचे उदघाटन केले होते. त्या पंचायती राज दिनाच्या प्रदर्शनामध्ये स्वेरीच्या डॉ. रणजितसिंह पवार यांना आमंत्रित केले होते. त्यानुसार डॉ. पवार यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन स्वेरीच्या आकृतीच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. या सादरीकरणास तेथील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 


          केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या पल्ली (जि.सांबा) या गावात दि.२४ ते २६ एप्रिल २०२२ दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डीएईने ही सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे मूल्य वाढवण्याची क्षमता असलेली उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे यात प्रदर्शन केले होते. पंचायती राज या संकल्पनेशी संबंधित असणारी विज्ञान-आधारित प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमातील स्टार्ट-अप्स ना प्रेरित करण्यासाठी व ग्रामीण अनुप्रयोगांसाठी स्पिन-ऑफ तंत्रज्ञान आणि डीएई च्या आकृती (प्रगत ज्ञान आणि ग्रामीण तंत्रज्ञान उपयोजन) यासारखे उपक्रम या प्रदर्शनात आयोजित केलेले होते. शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरी समाजाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने अभ्यागतांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे व संशोधन विभागाचे डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ जुलै २०२१ पासून बोईसर मध्ये स्वेरीचे आकृती केंद्र कार्यरत झाले आहे. बीएआरसीचे तंत्रज्ञान व तारापूर अणुऊर्जा प्रकल्प यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तथा ‘स्वेरी’या अनुभवी शैक्षणिक संस्थेला हे आकृती केंद्र चालवण्यासाठी दिले आहे. तेथे डॉ. रणजितसिंह पवार हे प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने त्यांना भारतातील पहिल्या ‘कार्बन-न्यूट्रल पंचायत’ अंतर्गत पल्ली येथील 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' च्या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. ग्रामीण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह पंचायती आणि ग्रामसभांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा केला जातो. भारतातील पंचायती राज प्रणाली तीन स्तरांमध्ये विभागली गेली आहे.

ज्यात गाव पातळीवर ग्रामपंचायत, मध्यवर्ती स्तरावर ब्लॉक पंचायत किंवा पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा पंचायत समाविष्ट आहे. भारतातील ग्रामीण भागाची प्रगती झाली तर देशाची खरी प्रगती झाली असे म्हणता येईल. भारतात सहा लाखांहून अधिक गावे आहेत, ज्यामध्ये सहा हजाराहून अधिक ब्लॉक्स आणि ७५० हून अधिक जिल्हे आहेत की जे सर्व पंचायती राज प्रणालीद्वारे शासित आहेत. ‘पंचायती राज’ ही संस्था भारतातील सर्वात जुन्या प्रशासकीय संस्थांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. ही यंत्रणा गावांना स्वतःची कामे करण्याची जबाबदारी देते. स्वशासनाच्या संकल्पनेमुळे भारतातील पंचायत प्रणाली चांगल्या प्रकारे चालण्यास मदत झाली आहे. ७३ व्या दुरुस्ती अधिनियम १९९२ नुसार, तळागाळातील सत्तेचे विकेंद्रीकरण झाले आणि ‘पंचायती राज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवस्थेची पायाभरणी सुरू झाली. राष्ट्रीय ‘पंचायती राज दिनाच्या’ या प्रदर्शना मध्ये डीएई तर्फे स्वेरीच्या डॉ. रणजितसिंह पवार यांच्या सोबत बीएआरसीच्या 'आकृती' च्या प्रमुख श्रीमती स्मिता मुळे व शास्त्रज्ञ डॉ. दर्शना साळसकर, डीएई चे जॉईंट सेक्रेटरी डॉ. दीप प्रकाश व डॉ. वत्स तसेच सतीश अय्यर व समीर फुलपगार हे सहभागी झाले होते.