पुणे - सातारा रस्त्यावरील पद्मावती चौकात टोळक्याची दहशत ; मध्यरात्री तरुणावर कोयत्याने केले वार

पुणे - सातारा रस्त्यावरील पद्मावती चौकात टोळक्याची दहशत ; मध्यरात्री तरुणावर कोयत्याने केले वार

चहा विक्रीच्या दुकानासमोर टोळक्याने दहशत माजवून तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्ममावती चौकात घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

चंद्रकांत दऱ्याप्पा कांबळे (वय २६, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कांबळे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आकाश कसबे आणि साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांबळे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील पद्ममावती चौकात एका चहाच्या दुकानासमोर चहा प्यायला थांबला होता. कांबळे आणि त्याचा मित्र चहा पित होते. त्या वेळी दोन ते तीन दुचाकीवरून टोळके आले. आरोपी कसबेने कांबळेबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. तू माझ्या भावाला का मारलेस ?, अशी विचारणा करुन कसबेने कांबळे याच्यावर कोयत्याने वार केले. कसबे याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी चहा पिण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करत आहेत.