सोलापूर महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग

सोलापूर महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग

महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला आग लागली असून, शहरावर धुराचे लोट पसरले आहेत. यामुळे शहर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, आणखी दोन दिवस ही आग आटोक्यात येणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

बुधवारी सायंकाळी लागलेली आग जवळपास 43 एकरमध्ये पसरली आहे.

सोलापूर महापालिकेच्या तुळजापूर रोडवर 54 एकर परिसरात कचरा डेपो आहे. या ठिकाणी बायोएनर्जी व बायोमेडिकल वेस्टचा प्रकल्प आहे. बुधवारी सायंकाळी या ठिकाणी अचानकपणे आग लागली. कडक ऊन व वाळलेला कचरा व वाऱ्यामुळे आग मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. सोलापूर महापालिकेचे अग्निशमन दल गेल्या दोन दिवसांपासून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन दिवसांत 55हून अधिक गाडय़ांना पाणी मारण्यात आले आहे. वाळलेला कचरा व वाऱ्यामुळे आग आटोक्यात न येता जवळपास 43 एकर परिसरात पसरली आहे. यामुळे शहराला प्रदूषणाचा विळखा बसला असून, सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा घटनास्थळी असून, पाण्याचा वापर करूनही मूळ आगीचा स्रोतच माहीत होत नसल्याने आग भडकत आहे. या आगीचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसत असून, हवेत प्रदूषण वाढल्याने आजारी व अस्थमाच्या रुग्णांचा त्रास वाढत चालला आहे.

या कचरा डेपोच्याविषयी अनेक तक्रारी व गैरकारभाराविरुद्ध हरित न्यायाधिकरणाकडे यापूर्वी याचिका दाखल करण्यात आली असून, पालिकेला नोटिसाही बजावल्या आहेत. प्रदूषणाबाबत सोलापूर येथील प्रदूषण मंडळाचे अधिकारी अजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

दोन दिवसांपूर्वी लागलेली आग विझविण्यासाठी 60 ते 70 हून अधिक गाडय़ांद्वारे पाणी मारण्यात आले आहे. परंतु, आग सर्वदूर पसरल्याने किमान दोन ते तीन दिवस आग विझविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले.