वडगावमधील पती-पत्नीसह चिमुकलीचा ओरिसातील भुवनेश्वरला मृत्यू ; ग्रामस्थ आक्रमक

वडगावमधील पती-पत्नीसह चिमुकलीचा ओरिसातील भुवनेश्वरला मृत्यू ; ग्रामस्थ आक्रमक

वडगावमधील पती-पत्नीसह चिमुकलीचा ओरिसातील भुवनेश्वरला मृत्यू झालाय.

कऱ्हाड (सातारा) : वडगाव हवेली Wadgaon Haveli (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा ओरिसातील भुवनेश्वरला (Orissa Bhubaneswar) मृत्यू झाला.

संबंधितांचे मृतदेह शुक्रवारी रात्री गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार देवून जमावानं रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका तालुका पोलीस (Karad Police) ठाण्यासमोर नेली. तिथं ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी जमावाशी चर्चा करुन नातेवाईकांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. तुषार राजेंद्र जगताप (वय 26), पत्नी नेहा तुषार जगताप (वय 21) व मुलगी शिवन्या तुषार जगताप (वय दीड वर्षे, सर्व रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भुवनेश्वर पोलिसांत (Bhubaneswar Police) खुनाचा, आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांची माहिती अशी, वडगाव हवेली येथील तुषार जगताप हा युवक ओरिसातील भुवनेश्वरला पत्नी नेहा व मुलगी शिवन्या यांच्यासह राहत होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी तिघांचेही मृतदेह आढळून आले. याची नोंद तेथील पोलिसांत झाली आहे. भुवनेश्वर येथे मयताची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिघांचेही मृतदेह रुग्णवाहिकेतून वडगाव हवेली येथे त्यांच्या गावी आणण्यात आले. येथे आल्यानंतर नातेवाईकांना त्यांचे मृत्यू हे संशयास्पद असून घातपात झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

त्यामुळं गावी मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने मृतदेहांसह रुग्णवाहिका तालुका पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व आक्रमक झालेला जमाव पाहून पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील हे त्वरित पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी जमावाबरोबर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. पहाटेच्या सुमारास वडगाव हवेली येथे पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.