प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान ~ संगीत क्षेत्रातील योगदानासाठी माय होम इंडियाने केले सन्मानित ~

मुंबई, २१ डिसेंबर २०२०: शास्त्रीय संगीतात रुची असणा-या आणि संगीताच्या सर्व दालनातून अतिशय यशस्वीपणे संचार करणा-या मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका 'लैश्राम मेमा' यांना माय होम इंडिया तर्फे 'वन इंडिया' पुरस्काराने गौरविण्यात आले. 'लैश्राम मेमा' यांना विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार सन्मानित गायिका अनुराधा पौडवाल, सारस्वत बँकचे अजयकुमार जैन, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना 'वन इंडिया' पुरस्कार प्रदान  ~ संगीत क्षेत्रातील योगदानासाठी माय होम इंडियाने केले सन्मानित ~

पुरस्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यसभा खासदार व 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद'चे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, लैश्राम मेमा यांना शास्त्रीय संगीत आवडत असले तरी गझल, सुगम संगीत आदी गीते त्यांनी मराठी हिंदी, बंगाली अस्मिया आदी भाषेतून गायली आहेत. तसेच  सामाजिक कार्याची आवड देखील त्यांना आहे. त्यामुळे माय होम इंडियाने 'वन इंडिया' पुरस्कारासाठी ख्यातकीर्त गायिका 'लैश्राम मेमा' यांची निवड केली हे कौतुकास्पद आहे.  माय होम इंडियाच्या वतीने रविवार, (ता.20) रोजी दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात 'वन इंडिया पुरस्कार २०२०'चे आयोजन करण्यात आले होते.

माय होम इंडिया ही स्वयंसेवी संस्था ईशान्य भारतातील लोकांना उर्वरित भारतासोबत जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे कार्य करते. यंदा संस्थेने कोरोना काळात ईशान्य भारतातील ५ हजारांहून अधिक नागरिकांना दर महिन्याचे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्याचे कार्य केले आहे. अशी माहिती माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.