अकलूजच्या शिवरत्नने पटकावला छत्रपती चषक

'डॉ.बी.पी.रोंगे सरांनी घालून दिलेल्या शिस्त आणि उत्तम नियोजनामुळे स्वेरीच्या यशात सातत्य' -छत्रपती क्रिकेट ॲकडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पंढरपूर – ‘दि. १३ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत स्वेरीच्या ग्राउंडवर क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. हे सामने यशस्वीपणे पार पडले की त्यासाठीच्या नियोजनातून स्वेरीला मिळणाऱ्या यशाचे गमक समजले. नियोजनातील सातत्य हेच यशाकडे घेऊन जाते. स्वेरीच्या सर्व सोयींनी युक्त असलेल्या या मैदानावर खेळाडूंमध्ये कोणताही वाद- विवाद न होता, सामंजस्य व शिस्तीत सामने पार पडले. खरं तर हे आमच्यासाठी एक आव्हान होते परंतु स्वेरीचे नियोजन उत्तम असल्यामुळे सर्व शक्य झाले. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात स्वेरीचे नाव अग्रेसर आहे ते याच कारणांनी ! बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये कुठेही कमतरता भासली नाही. त्यामुळे सर्व खेळाडू एक वेगळ्या प्रकारे शिस्तीचा अनुभव घेवून परतले. ज्या ठिकाणी शिस्त, उत्तम नियोजन असते त्या ठिकाणी यश असते हे स्वेरीने सिद्ध केले. डॉ.बी.पी.रोंगे सरांनी घालून दिलेल्या शिस्त आणि उत्तम नियोजनामुळे स्वेरीच्या यशात सातत्य आहे.' असे प्रतिपादन छत्रपती क्रिकेट ॲकडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले.

अकलूजच्या शिवरत्नने पटकावला छत्रपती चषक

गोपाळपूर येथे श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूटच्या भव्य क्रीडांगणावर छत्रपती अकॅडमी आणि स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने खेळाडूंना उत्साह, उर्जा मिळावी या हेतूने १७ वर्ष खालील खेळाडूंसाठी दहा दिवस क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले होते. त्याच्या समारोप प्रसंगी छत्रपती ॲकडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील खेळाडूंना मार्गदर्शन करत होते. या सामन्यामध्ये परभणी, गंगाखेड, सोलापूर, अकलूज, पंढरपूर आणि सांगली या सहा ठिकाणच्या तब्बल बारा संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अंतिम सामना हा अकलूजच्या शिवरत्न क्रिकेट क्लब आणि  गंगाखेडच्या रायझिंग क्रिकेट अकॅडमी यामध्ये झाला त्यात गंगाखेड संघाने प्रथम फलंदाजी घेत पवन बनसकरच्या  ६१ चेंडूत ८१ धावांच्या मदतीने वीस शतकात दोन बाद १५४ धावा केल्या तर त्याच्या प्रत्युत्तरात अकलूजच्या शिवरत्न संघाने वीस षटकात ९ बाद १५५ धावा केल्या. शिवरत्नच्या  आर्शिन कुलकर्णी याने २६ चेंडूत ५१ धावा काढल्या. श्रवण चौधरीने २२ धावा देत २ गडी बाद केले तर वरद  कुलकर्णी याने ३२ धावा देत २ गडी बाद केले पण अखेरच्या षटकात अकलूज संघाने  गंगाखेडच्या रायझिंगचा अवघ्या एक विकेट राखून थरारक सामना जिंकला आणि प्रथम क्रमांकाचा रोख रु. पंधरा हजार पाचशे पंचावन्न व चषक हा मान मिळवला.

द्वितीय क्रमांक गंगाखेडने पटकाविला. त्यांना अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक पुरस्कार देखील देण्यात आले. यात मॅन ऑफ द सिरीज अकलूज संघाचा आर्शिन कुलकर्णी याला रु. एक हजार एकशे पंचावन्न व चषक, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार गंगाखेड संघाचा पवन बनसकरला एक हजार एकशे अकरा रु. व चषक, उत्कृष्ट गोलंदाज गंगाखेड संघाचा एजाज खानला एक हजार एकशे अकरा रु. व चषक, उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून छत्रपती क्रिकेट ॲकडमीचा अपूर्व पाटील यांनी पुरस्कार पटकाविला. यावेळी योगेश बडवे, प्रवीण सापणेकर, किरण सोळंकी यांनी सामन्यांमध्ये पंचांची भूमिका उत्तमपणे बजावली. यावेळी विनोद चौगुले, रमजान पठाण, शिवाजी पाटील, सचिन तांबिले, बापू कदम, वेदांत महाजन, विजय बहोत, बाळासाहेब ननवरे आदी उपस्थित होते. तर स्वेरीच्या वतीने एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडुंना पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी प्रा. पाटील म्हणाले की 'या ठिकाणी केवळ स्पर्धा भरवणे हा हेतू नव्हता तर खेळाडूंमध्ये खिलाडीवृत्ती जोपासणे हा होता. प्रत्येक खेळात हार-जीत ही होतच असते. पण महत्वाचे असते ती आपल्यातील खिलाडीवृत्ती! आणि हाच महत्वाचा भाग आपल्या खेळाडूंमध्ये दिसून आला. शेवटचा सामना तर अप्रतिम होता, कोण बाजी मारेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नव्हते.’ स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामने सुरळीत पार पडले. उपस्थितांचे आभार छत्रपती क्रिकेट ॲकडमीचे संचालक रवी निंबाळकर यांनी मानले.