दीड कोटी मिळाले अन 55 हजारांसाठी जीव गेला ; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ

Pandharpur Live Online :
महोबा - उत्तर प्रदेशातील महोबा इथं एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूनं राज्यात खळबळ माजली आहे. एकलुत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानं घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील ग्योडी गावात राहणाऱ्या २२ वर्षीय राजन कुटुंबात एकटा मुलगा होता. वडील धर्मेंद्र सिंह यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मृतकाला अल्पवयीन बहीण आहे ती शिक्षण घेतेय. २० मार्चला राजन अचानक गायब झाला होता. आईनं तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. त्यानंतर एकेदिवशी घराच्या जवळ असलेल्या विहिरीत राजनचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबाला धक्का बसला. त्याच्या शरीरावर अनेक मारहाणीच्या खूणा होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. मुलाचा मृतदेह सापडल्याने आई बेशुद्ध झाली होती. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक पवन कुमार पटेल म्हणाले की, दीड कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळाल्यानंतर राजन मित्रांसोबत पार्टी करत होता. गेल्या १० दिवसांत त्याने ५५ हजाराची दारू प्यायली. त्यानंतर तो मानसिक तणावाखाली गेला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुंदेलखेड एक्सप्रेस हायवे बनवण्यासाठी युवकाच्या आईची ११ एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. त्यामुळे रानी सिंहला दीड कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळाली. त्यानंतर युवकाची आई रानी सिंह हिने मुलासाठी महोबा इथं ३२ लाख रुपये खर्च करून प्लॅट खरेदी केला. रमईपूर येथेही ७ लाखांची जमीन विकत घेतली. राजनच्या नावावरही ५ एकर जमीन होती. परंतु मित्रांच्या नादी लागून तो वाईट संगतीला गेला. राजनच्या मित्रांनी त्याला जाळ्यात अडकवत दारूचं व्यसन लावलं. त्याच्यावर ५५ हजारांचे कर्ज झाले. ते मित्र मागत होते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता. राजनच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.