एक महिन्याच्या आत शरद पवारांच्या तीन शस्त्रक्रिया, सार्वजनिक कार्यक्रम आणि दौरे रद्द , सध्या सिल्व्हर ओक बंगल्यावर विश्रांती

Pandharpur Live Online : एक महिन्याच्या आत ८० वर्षांच्या शरद पवारांच्या तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा तसेच तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या शरद पवार मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर विश्रांती घेत आहेत.

एक महिन्याच्या आत शरद पवारांच्या तीन शस्त्रक्रिया, सार्वजनिक कार्यक्रम आणि दौरे रद्द , सध्या सिल्व्हर ओक बंगल्यावर विश्रांती

राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. यानंतर त्यांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवार यांच्या तोंडातून अल्सर काढण्यात आला. ही तिसरी शस्त्रक्रिया बुधवारी (२१ एप्रिल २०२१) झाली. 

शरद पवार वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत विश्रांती घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांच्या तिन्ही शस्त्रक्रिया वेगवेगळ्या दिवशी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाल्या.

देशभर कोरोना संकट सुरू आहे. या वातावरणात एक महिन्याच्या आत ८० वर्षांच्या शरद पवारांच्या तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा तसेच तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसेच अमित शहांकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. काही भेटींची जाहीर चर्चा करायची नसते अशा स्वरुपाचे मोघम उत्तर देऊन अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांना पवारांसोबतच्या चर्चेची माहिती देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला होता. वैद्यकीय कारणांमुळे पवारांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम आणि दौरे रद्द झाले आहेत. सध्या शरद पवार मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर विश्रांती घेत आहेत.

शरद पवार यांच्यावर झाल्या तीन शस्त्रक्रिया

  1. ३० मार्च २०२१ - एन्डोस्कोपी करुन शरद पवार यांच्या पित्ताशयातील खडे काढले
  2. १२ एप्रिल २०२१ - शरद पवार यांच्या पित्ताशयाची दुसरी शस्त्रक्रिया, पित्ताशय काढले
  3. २१ एप्रिल २०२१ - शरद पवार यांच्या तोंडाची शस्त्रक्रिया, तोंडातून अल्सर काढला