म.फुले आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आ.परिचारक यांचा पुढाकार ; रूग्णालयाचे बिल तपासणीसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

Pandharpur Live : पंढरपूर- कोरोनाच्या महामारीमुळे रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

म.फुले आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आ.परिचारक यांचा पुढाकार ; रूग्णालयाचे बिल तपासणीसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

दरम्यान याची दखल घेवून येथील उपजिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी तातडीने बैठक घेवून यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच कोविड रूग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुके तर हॉटस्पॉट बनले आहेत. रोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळून येत असल्याने रूग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या देखील मोठी आहे. या रूग्णांकडून भरमसाठ बिल आकारले जात असल्याच्या तक्रार रोज येत आहेत. सरकारी दवाखान्यात बेडची संख्या मर्यादित असल्याने नागरिक खासगी रूग्णालयात
भरती होत आहेत. येथे रूग्णांचे बिल मोठ्या प्रमाणात आकारण्यात येत आहे.

अनेकांचे वार्षिक उत्पन्न नाही तेवढे बिल होत असल्याने रूग्णांचे नातेवाई हतबल झाले आहेत. याबाबत आमदार परिचारक यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला असून सदर समस्या मांडली. त्यानुसार आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.ढेले, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, डॉ.प्रसन्न भातलवंडे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक वाघमारे, डॉ.संजय देशमुख,डॉ.पाचकवडे, डॉ.शिनगारे, डॉ.कारंडे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.


यामध्ये आमदार परिचारक यांनी, महात्मा फुले योजना सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना याची खर्‍या अर्थाने गरज आहे. म्हणून रूग्णालयांनी जास्तीतजास्त पिवळ्या व नंतर केशरी कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी सूचना केली. बैठकीमध्ये डॉ.ढेले यांनी, रूग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी विविध अधिकार्‍यांची
नियुक्ती करण्याची सूचना देखील केली. त्यानुसार सदर अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


ज्या रूग्णांची अधिक बिला बाबत तक्रार असेल त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.