Good Bye 2020 : ये जाते हुये लम्हो...

** डॉ.संजय रणदिवे 8600386896 .................................................... ये जाते हुए लम्हों,जरा ठहरो, हे बॉर्डर सिनेमातील गीत ऐकत असतानाच मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले. खरंच हे लम्हे,हे क्षण थांबावे वाटतात का? का या क्षणांच्या आठवणी नकोशा वाटत आहेत. खरच असं काय घडलय? नवीन वर्षाची चाहूल लागत असतानाच गतवर्षीचे अनेक भलेबुरे अनुभव पण डोळ्यासमोर तरळत आहेत. असं म्हणतात की नवीन गोष्टींचा स्वीकार करत असताना, जुन्या गोष्टी विसरून जायच्या असतात. खरंच गतवर्षीच्या जुन्या आठवणी विसरून जायला हव्यातच का? का यातून काही बोध पण घ्यायचा आहे.

Good Bye 2020 : ये जाते हुये लम्हो...
अक्षरशह जसा काळ स्थितप्रज्ञ होतो तसं 2020 साल हे ऐतिहासिक वर्ष म्हणून गणले जाईल. खरं तर सगळं जग  एका विषाणू ने जागी स्थिर केलं होतं. संपूर्ण पृथ्वी कवेत घेऊन चंद्रावर घर करायला निघालेल्या माणसाला, कोरोना सारख्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म विषाणू अत्यंत मोठे आव्हान दिले होते. गर्वाचे घर खाली असं म्हणतात ते एका सूक्ष्मजीवांने जगाला दाखवून दिले. सदैव व्यस्त असणार्‍या,सतत नावीन्याच्या शोधात असणार्‍या आणि संपूर्ण सृष्टीचा चेहरामोहरा बदलण्यात व्यस्त असणाऱ्या, मानवी प्रगत समूहाला एका सूक्ष्म विषाणूने एका जागी स्तब्ध, जसा बर्फ गोठलेल्या अवस्थेत असतो त्या अवस्थेत बसायला लावले. हा पण सृष्टीचा प्रकोप म्हणावा लागेल. 
 
या वरून निसर्गापेक्षा कोणी मोठा नाही, निसर्ग हवे तेव्हा, हव्या त्यावेळी, त्याला पाहिजे त्या गोष्टी करून घेऊ शकतो, हे एका घटनेतून सिद्ध करून दाखवले.. 2020 साल अस्ताला जात असताना अनेक गोष्टी आणि प्रसंग डोळ्यासमोरून जात आहेत. जस आपण गाडीतून बसून प्रवासाला जात असताना झाडे पळताना दिसतात,मात्र आपणच पुढे मार्गक्रमण करत असतो.हे सगळे चांगले, वाईट भले-बुरे अनुभव आहे इथेच राहणार आहेत.आपणच काळाच्या ओघात पुढे जाणार आहोत. मात्र पुढे जात असताना मागील चुका दुरुस्त करीत, नवीन नवनिर्मितीचा ध्यास घेत सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत.याचा विचार पण करायला पाहिजे. 2020 साल नुकतेच सुरू झाले होते.सर्व संकल्पसिद्धी करून झाल्या होत्या. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या वूहान प्रांतात कोरोना नावाचा विषाणू सापडला होता. मानवी समूहाला त्यांची नुकतीच ओळख झाली होती. कोरोना ने चीनच्या काही प्रांतात धुमाकुळ घालुन भारताच्या केरळमध्ये आणि नमस्ते ट्रम्प च्या दिमाखदार आयोजना नंतर भारतात दाखल झाला होता. तोपर्यंत आपल्या आरोग्य यंत्रणेला याची कोणतीही माहिती नव्हती. आपल्याच विश्वात आणि आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नात व्यस्त असणाऱ्या भारतीय चाकरमान्यांच्या ध्यानीमनीही नसताना अनाहूतपणे या जीवघेण्या विषाणूने प्रवेश केला आणि काही समजायच्या आत 17 मार्च पासून संपूर्ण देशात मानवी जमातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण भारतात कोणताही विचार न करता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.कधीही घरात न बसणारे भारतीय तब्बल 75 दिवस घरात बंदिस्त करण्यात आले. एका बाजूला कोरोना च्या संसर्गातून बचावाची भूमिका तर एका बाजूला जीवन जगण्यासाठी, पोटाची आग विझवण्यासाठी, आणि आपल्या माणसात आपल्या मातीत जाण्यासाठी केलेली नागरिकांनी केलेली पायपीट कोण विसरू शकणार आहे.
 
अशा प्रसंगातून खऱ्या मानवी समूहाच्या घडणारे दर्शन पण तितकेच महत्त्वपूर्ण वाटते. कधी ताट, कधी वाट्या, कधी दिवे यातून घडणारे एकात्मतेचे दर्शन.पण त्याच वेळी निरपराध जनतेची होणारी उपासमार हे पण विसरता येणे शक्य नाही राजकीय परिस्थितीचा विचार करतानासुद्धा 2020 साल हे वेगळेपण सिद्ध करणारे ठरले. कोणत्या प्रसंगाचा कोण कसा उपयोग करून घेतो, आपल्या पोळीवर तूप ओढून कसा घेतो. याचं जिवंत उदाहरण म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या निवडणूका कडे पाहता येईल. राजकारणात कोणी कोनाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणीच कोणाचा मित्रही नसतो हे भाजप-शिवसेनेच्या पंचवीस वर्षाच्या अभेद्य युतीच्या दुभंगा ने आणि सदैव धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणाऱ्या काँग्रेसने शिवसेनेशी केलेल्या घरोब्या ने जगाला दाखवून दिले.सत्तेची गणिते ही खऱ्या व्यवहारातील गणितापेक्षा कशी वेगळी असतात हे शरद पवारांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. देशात अनेक शेतकरी आत्महत्या करतात, निष्पाप सदैव देश आणि त्याचा ध्यास घेऊन सीमेवरती लढणाऱ्या जवानांना पेक्षा एखाद्या कलाकाराची आत्महत्या कशी वेगळी असते आणि त्याच्या आत्महत्येच्या प्रसंगाचा वापर करून राजकारण कसे करता येते या काळ्या बाजूची ओळख सुद्धा 2020 साला ने आपणास करून दिली. 
 
 भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.शेतकऱ्यांचा देश आहे पण गेले तीस दिवस आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला पंतप्रधानांना वेळ नाही यावरून देश शेतीप्रधान आहे की भांडवलप्रधान आहे याचाही गुंता आपण गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवत आहोत. देशाची प्रगती करत असताना देशातील महत्त्वाच्या संस्थांचे खाजगीकरण करणे गरजेचे आहे. असा संदेश जाणीवपूर्वक भारतीयांमध्ये रुजवण्यात येत आहे. हे सत्य गेल्या वर्षी समस्त भारतीयांच्या नजरेतून सुटले नाही. पेट्रोल, डिझेल गॅस दर जरा जरी वाढले तर बांगड्या, साड्या पाठवणारे नेते मंडळी पेट्रोलचे भाव गगनाला जरी भिडले तरी चिडीचूप बसतात. आपल्या पक्षाचे उत्सव साजरे करतात. हे पण याची देही याची डोळा आपणास पाहायला मिळाले. हो हे सगळं बदलता येत. सगळच काही चिरकाल टिकणारे नसतं, शाश्वत नसतं. यासाठी गरज असते ती मनाने खंबीर आणि कणखर होण्याची आणि सत्य  स्वीकारण्याची. असं असेल तर आपण नक्कीच या सर्व सकारात्मक गोष्टी प्रत्यक्षात आणू शकू. एवढीच या वर्षीची आपणास शुभेच्छा. येणारे वर्ष आपणास भरभराटीचे आनंदाचे जावो हीच नववर्षाची शुभेच्छा....